शिवसेनेच्या दोन मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष; कोण गाजवणार वर्धापनदिन?
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत असताना पक्षातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही शिवसेना आज स्वतंत्रपणे वर्धापनदिन साजरा करत असून या दोन्ही मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.उद्धव ठाकरे गटाचा वर्धापनदिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे, तर शिंदे गटाचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून येत असून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

दोन्ही गटांकडून वक्त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली असली, तरी अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कोणता संदेश देणार, याची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, खासदारांच्या पक्षांतरानंतर ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.दुसरीकडे, शिंदे गटाच्या मेळाव्यातही नेतृत्वाकडून ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या भाषणांमधून आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळू शकते.
दरम्यान, शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शेकडो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून प्रवेशद्वारांवर कसून तपासणी सुरू आहे. मेळाव्याच्या ठिकाणी शिस्त राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या दोन्ही मेळाव्यांतून आगामी काळातील शिवसेनेची दिशा आणि रणनीती स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे लक्ष आजच्या भाषणांकडे लागले आहे.




