पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाई; उद्यापासून 15% पाणी कपात, पवना धरणातील साठा चिंताजनक पातळीवर

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाई; उद्यापासून 15% पाणी कपात, पवना धरणातील साठा चिंताजनक पातळीवर

मुंबई (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरात उद्यापासून 15 टक्के पाणी कपात लागू होणार आहे. पवना धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.शहराला मुख्यत्वे पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा सध्या केवळ 19 टक्क्यांवर आला आहे. वाढते तापमान, पावसाचा विलंब आणि धरणातील वाढते बाष्पीभवन यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार उपलब्ध पाणी साठा जुलैअखेरपर्यंतच पुरू शकतो.

महापालिका दररोज पवना धरणातून सुमारे 500 एमएलडी पाणी उचलते, तर आंद्रा धरणातूनही शहराच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र दोन्ही धरणांतील साठा घटत असल्याने आता शहरात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर परिणाम होणार आहे.विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडमध्ये आधीपासूनच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अशा परिस्थितीत नव्याने लागू होणारी 15 टक्के कपात नागरिकांसाठी आणखी अडचणी निर्माण करू शकते.

महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, गळती तातडीने दुरुस्त करण्याचे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाचे आगमन होईपर्यंत पाणी जपून वापरणे हीच काळाची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.