ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेवर कैलास पाटलांचे सूचक वक्तव्य
मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदार पक्ष सोडण्याच्या चर्चांना वेग आला असताना, धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे खासदार पक्षातून बाहेर पडू शकतात, अशा चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर कैलास पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पाटील म्हणाले, "मला पक्ष सोडायचा असता तर मी सूरतच्या बॉर्डरवरून परत आलो नसतो. ओमराजे निंबाळकर आणि माझी मैत्री आहे, मात्र मैत्री आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत."यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावरही टीका केली. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विकासनिधी मिळत नसल्याची वस्तुस्थिती असल्याचे सांगत, ही पद्धत लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले. "एखादा आमदार किंवा खासदार विरोधी पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनता कोणत्याही एका पक्षाची नसते. त्यामुळे निधी वाटपात भेदभाव होऊ नये," असेही ते म्हणाले.
पक्षनेतृत्वाची चूक नसून सत्ताधारी पक्षाने विरोधकांना अडचणीत आणणारी परिस्थिती निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. यंत्रणा आणि विकासनिधीच्या माध्यमातून विरोधी पक्षाला मर्यादित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या आगामी बैठकीत उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात, त्यानुसार पुढील रणनीती ठरवली जाईल, असेही कैलास पाटील यांनी सांगितले.राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये कैलास पाटील यांच्या या वक्तव्याकडे आता विशेष लक्ष लागले आहे.




