'सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच!'; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
परळी: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या एका ताज्या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. परळी येथील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या तंदुरुस्तीवरून भाष्य करताना अत्यंत सूचक वक्तव्य केले. यामुळे धनंजय मुंडे लवकरच पुन्हा एकदा मंत्रिमंडळात 'कमबॅक' करणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

"सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालं होतं..."
परळीतील कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले, "मी सध्या स्वतः जीम करत असून माझं वजन बऱ्यापैकी कमी केलं आहे. तसं पाहायला गेलं तर सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. मात्र, आता येणारा काळ हा आपलाच आहे आणि त्या काळात काम करण्यासाठी आपण पूर्णपणे फिट राहिलं पाहिजे. म्हणूनच मी आता जीममध्ये घाम गाळत आहे."
"लोकांचे प्रश्न ऐकून परेशान झालो होतो"
आपल्या तब्येतीबाबत बोलताना मुंडे पुढे म्हणाले, "गेल्या एक ते दीड वर्षात जीवातले जिवलग सहकारी आणि मित्र जेव्हा जेव्हा मला भेटायचे, तेव्हा सर्वांचा एकच प्रश्न असायचा – 'भाऊ तब्येत कशी आहे?' हा एकच प्रश्न ऐकून ऐकून मी परेशान झालो होतो. त्यामुळेच मी ठरवले की, आता आपण आपली फिटनेस सुधारायची आणि स्वतःचा चमत्कार दाखवायचा!"
धनंजय मुंडे यांच्या या मिश्कील परंतु राजकीय अर्थ दडलेल्या वक्तव्यामुळे ते आगामी काळात नेमका काय 'चमत्कार' घडवून आणतात आणि महायुती सरकारमध्ये त्यांचे वजन पुन्हा कसे वाढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




