मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मनोज जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर ; नेमकं कारण काय..?
मुंबई - मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात दोघांची उपस्थिती निश्चित झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हा सोहळा भाजप आमदार समाधान अवताडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. अवताडे यांनी सांगितले की, या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होईल. तसेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही अधिकृत निमंत्रण देण्यात आले असून त्यांनी उपस्थितीची खात्री दिली आहे. या कार्यक्रमाला राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि सर्व पक्षांचे नेते मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे पाटील एकत्र दिसणार असल्यामुळे या कार्यक्रमाचे राजकीय वजन प्रचंड वाढले आहे. पुतळा समितीचे सदस्य कौंडू भैरी यांनी म्हटले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील भूमिका घेतली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही या सोहळ्यास उपस्थित राहण्यास संमती दिली आहे.”
गेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट दिली नव्हती. ओबीसी समाजाची नाराजी टाळण्यासाठी सरकारने त्यावेळी सावध भूमिका घेतली होती. मात्र, आता दोघेही एकाच मंचावर दिसणार असल्याने राज्याच्या राजकारणात या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजांचे आराध्य दैवत असल्याने या अनावरण सोहळ्यास सर्वच पक्षांचे नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आता खरोखरच मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे एकाच व्यासपीठावर येतात का, हे 26 ऑक्टोबरला स्पष्ट होईल.




