राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? निर्णय अजूनही अनिश्चित

राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? निर्णय अजूनही अनिश्चित

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. खा. संजय राऊत यांनी राज ठाकरे काँग्रेससोबत जाण्यास इच्छुक असल्याचं सांगितल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही असून लवकरच निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. मनसेकडून सुद्धा कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. पक्षाचे नेते म्हणतात, याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील.

याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मनसेच्या सहभागावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.  काँग्रेस याला अनुकूल आहे का? राज ठाकरे स्वतः काय भूमिका घेणार? आणि महाविकास आघाडीचं आगामी निवडणुकांतील भवितव्य काय असणार? दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीच्या चर्चाही सुरू असून लवकरच ती औपचारिक होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी, मनसेला थेट महाविकास आघाडीत आणण्याचे प्रयत्नही काही स्तरांवर सुरू असल्याचं चित्र आहे.

दुसऱ्या बाजूला, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज राज्यातील नेत्यांसोबत बैठक घेऊन महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत ‘स्वबळावर लढावं’ अशी भूमिका अनेक नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस मनसेसोबत युतीला फारशी उत्सुक नसल्याचं संकेत मिळत आहेत.

महायुतीविरोधात भक्कम पर्याय उभा करण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि मनसे एकत्र यावं अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यासाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबतही चर्चा सुरू असल्याचं समजतं.

राज्यातील पाच महापालिकांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युती करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये टिकून राहील का, काही ठिकाणीच असेल का, हे स्पष्ट झालेलं नाही. मनसे आघाडीत सहभागी होणार का? यावरही अजून निर्णय प्रलंबित आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेस आणि मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.