'या' प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा - संजय राऊत
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूरच्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना झापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. या प्रकरणात काही व्यक्तींनी कारवाई थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केल्यामुळे, त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. राऊत म्हणाले की, "शिंदे आणि पवार यांच्या सोबत असलेले अनेक लोक चोर, डाकू, स्मगलर, खूनी आणि बलात्कारी आहेत. या लोकांना संरक्षण देण्यासाठीच सत्ता वापरली जात आहे."

राऊतांनी मावळमधील बेकायदेशीर खाणकामाचा मुद्दा उपस्थित करत आमदार सुनील शेळके यांच्या विरोधातील कारवाईसुद्धा थांबवण्यात आली असल्याचा आरोप केला. "या सगळ्या प्रकारांना उपमुख्यमंत्री अजित पवार संरक्षण देत आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बेकायदेशीर काम करण्यास भाग पाडले जात आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे," असंही राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, "७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केला होता. आणि आज हेच उपमुख्यमंत्री अजित पवार एका तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामासाठी दम देत आहेत. मग ही आर्थिक शिस्त कुणासाठी?"
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणात गप्प राहणं म्हणजेच राज्याच्या तिजोरीला चुना लावणं असल्याचं सांगत राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "नैतिकतेच्या मुद्द्यावर इतरांना राजीनामे द्यायला लावणारे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः मात्र पदावर का राहतात?" असा सवालही त्यांनी केला.
शेवटी, राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करत म्हटलं की, "मणिपूरमध्ये हिंसा सुरू असताना पंतप्रधान तिथे जाण्याचं धाडस दाखवत नव्हते. ते एक अत्यंत डरपोक व्यक्तिमत्व आहेत. आता मात्र इतिहासात नाव बदनाम होऊ नये म्हणून ते मणिपूरला जात आहेत."




