सचिन अहिर विधानपरिषदेचे उपसभापती बिनविरोध; फडणवीसांचे कौतुक, शिंदेंनी शायरीतून दिल्या शुभेच्छा

सचिन अहिर विधानपरिषदेचे उपसभापती बिनविरोध; फडणवीसांचे कौतुक, शिंदेंनी शायरीतून दिल्या शुभेच्छा

मुंबई (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीकडून सुरुवातीला ज. मो. अभ्यंकर यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, सभागृहाची परंपरा आणि एकमताचा सन्मान राखत विरोधकांनी आपला प्रस्ताव मागे घेतल्याने सचिन अहिर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

सचिन अहिर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. फडणवीस यांनी अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. "अहिर" या शब्दाचा अर्थ गोपालक आणि निर्भीड असा होत असल्याचे सांगत, सचिन अहिर हे निर्भीडपणे काम करणारे नेतृत्व असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले की, 1999 मध्ये ते आणि सचिन अहिर एकाच वेळी विधानसभेत निवडून आले होते. मिल कामगार चळवळीतून पुढे आलेल्या अहिर यांनी मंत्री म्हणूनही प्रभावी कामगिरी केली असून, सामाजिक क्षेत्रातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी ते निःपक्षपातीपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचाही गौरव केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सचिन अहिर यांना शुभेच्छा देताना त्यांच्या निर्णयक्षमतेचे कौतुक केले. "नावात सचिन आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. एक सचिन क्रिकेटमधून इतिहास घडवून गेला, तर दुसरा आता विधानपरिषदेत नवी इनिंग सुरू करत आहे," असे म्हणत त्यांनी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची उपमा दिली.

यावेळी शिंदे यांनी शायरीतूनही अहिर यांचे स्वागत केले. "तुफान में जो शांत रहे उसे समुंदर कहते हैं, जो सबके दिल पर राज करते हैं उसे सिकंदर कहते हैं," असे म्हणत त्यांनी नव्या उपसभापतींना शुभेच्छा दिल्या.विरोधी पक्षाकडूनही सभागृहाच्या परंपरेचा सन्मान राखत सहकार्य करण्यात आले. त्यानंतर बहुमताने प्रस्ताव मंजूर झाला आणि सचिन अहिर यांच्या उपसभापतीपदाची अधिकृत घोषणा करण्यात आली.