तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे संजय राऊतांच्या घरी
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवसेना (ठाकरे गट) खा. संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. खा. राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे विशेष भेटीस गेल्याचे समजते. या भेटीनंतर राऊत यांचे बंधू आणि ठाकरे गटाचे आ. सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आमच्या घरी आले.

संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी एक गंभीर आजाराचे निदान झाले होते. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर हे उघड केले होते. डॉक्टरांनी त्यांना कठोर विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीत अपेक्षेपेक्षा जलद सुधारणा होत असल्याचे आता समोर आले आहे. भेटीदरम्यान राज ठाकरे यांनीही प्रेमळ शैलीत त्यांना लोकांमध्ये जाऊ नको, दीड-दोन महिने आराम कर, असा सल्ला दिल्याचे आ. सुनील राऊत यांनी सांगितले.
आ. सुनील राऊत म्हणाले, संजय आजारी आहेत, आणि राज ठाकरे सतत माझ्या संपर्कात होते. त्यांची तब्येत कशी आहे, पुढील उपचार कसे असावेत, अगदी यूएसला न्यायची गरज आहे का, याबाबतही ते विचारणा करत होते. आजची भेट जवळपास 25-30 मिनिटं चालली. तसेच राज ठाकरे यांनी पूर्वी ते त्यांच्या घरी आले होते त्यावेळच्या रस्त्यांबद्दल, परिसरातील बदलांबद्दलही हलक्या फुलक्या गप्पा मारल्याचे आ. सुनील राऊत यांनी सांगितले.




