‘विसरू नको तू मला’साठी शाल्व किंजवडेकरची जबरदस्त मेहनत; ४ महिन्यांच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा

‘विसरू नको तू मला’साठी शाल्व किंजवडेकरची जबरदस्त मेहनत; ४ महिन्यांच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : स्टार प्रवाहवरील नवी मालिका विसरू नको तू मला २९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांची ताजी जोडी पाहायला मिळणार आहे. कोकणातील निसर्गरम्य गुहागर येथे मालिकेचे चित्रीकरण सुरू असून, सुंदर लोकेशन्स आणि भावनिक प्रेमकथेने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

मालिकेत शाल्व ‘सूर्या तांडेल’ ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. नाखवा कुटुंबातील सूर्या हा घरातील सर्वांचा लाडका, जबाबदार आणि कष्टाळू मुलगा आहे. बाहेरून कणखर दिसणारा हा तरुण मनाने मात्र अतिशय प्रेमळ आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असतो. त्याच्या आगमनानंतर कुटुंबाच्या व्यवसायाला यश मिळाल्याने घरातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्याच्याच हस्ते केली जाते.

या भूमिकेला न्याय देण्यासाठी शाल्वने स्वतःवर विशेष मेहनत घेतली आहे. तब्बल चार महिने कठोर डाएट, शिस्तबद्ध जीवनशैली आणि दररोज तीन तासांच्या व्यायामाच्या मदतीने त्याने स्वतःचा लूक पूर्णपणे बदलला आहे.याबाबत बोलताना शाल्व म्हणाला, “सूर्या हा नारळासारखा आहे. तो वरून कठोर वाटतो, पण आतून तितकाच प्रेमळ आणि मोठ्या मनाचा आहे. या भूमिकेसाठी मी गेल्या चार महिन्यांपासून माझ्या फिटनेसवर विशेष लक्ष दिले आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायामामुळे माझ्यात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत.”

शाल्वचा हा फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन आणि कोकणाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी प्रेमकथा प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. आता २९ जूनपासून दररोज सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणारी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात किती घर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.