ठाकरेंना मोठा धक्का? सहा खासदारांच्या शिंदे गटात विलिनीकरणाची घोषणा 20 जूनला होण्याची शक्यता
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा खासदारांच्या शिंदे गटात विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी पत्र सादर केले आहे. या पत्रात त्यांनी ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या विलिनीकरणाबाबतची अधिकृत घोषणा 20 जून रोजी, म्हणजेच शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच दिवशी संसदेकडून बुलेटिन जारी करून या खासदारांच्या शिंदे गटातील समावेशाबाबत माहिती दिली जाऊ शकते.गुरुवारी झालेल्या ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला पक्षाचा व्हीप असूनही सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे. बैठकीला केवळ संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते.
अनुपस्थित खासदारांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तर समाधानकारक न मिळाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.दुसरीकडे, ठाकरे गटाने बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली आहे. "पक्षाच्या चिन्हावर निवडून आला असाल तर आधी राजीनामा द्या," असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच पक्षाकडून पुढील राजकीय रणनीतीही आखली जात असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.




