सिद्धिविनायक मंदिर दानपेटी चोरी प्रकरणावरून राज ठाकरेंचा खळबळजनक दावा; दरवर्षी तब्बल १८ कोटींचा डल्ला
मुंबई: मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेना वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना त्यांनी विश्वस्तांचे एक पत्र वाचून दाखवत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली.

एफआयआर आणि प्रत्यक्षातील आकडेवारीतील तफावत
या चोरी प्रकरणाची सुरुवात महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरीच्या एफआयआरचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता.
२० मार्च २०२६ रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, राजेंद्र रामचंद्र पेंडुरकर या कामगारावर पुजारी कक्षातील आरतीच्या दानपेटीतून रक्कम चोरी केल्याचा आरोप होता. परंतु, पोलिसांच्या दप्तरी ही चोरीची रक्कम केवळ १० हजार रुपये दाखवण्यात आली आहे. या प्रकरणी राजेंद्र पेंडुरकरसह ८ जणांना अटक झाली असली, तरी हे प्रकरण पुढे सरकले नाही. एवढी मोठी चोरी एका व्यक्तीकडून होणे शक्य आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
विश्वस्त, पूजारी आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
एकीकडे पोलिसांच्या तक्रारीत अवघ्या १० हजार रुपयांच्या चोरीचा दावा केला गेला असताना, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेल्या पत्रात दरवर्षी तब्बल १८ कोटींच्या दानावर डल्ला मारला जात असल्याचे नमूद आहे. यामुळे मंदिरातील कर्मचारी, पूजारी आणि विश्वस्तांबरोबरच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही आता गंभीर शंका उपस्थित केली जात आहे.
आरोपांनंतर दानाची रक्कम झाली दुप्पट!
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि संशयास्पद टप्पा म्हणजे, हे प्रकरण समोर येण्यापूर्वी सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासातील दानपेटीत दरवर्षी साधारण ४० ते ४५ लाख रुपये जमा होत होते. मात्र, गेल्या महिन्याभरात ही जमा होणारी रक्कम ९० ते ९८ लाख रुपयांपर्यंत (अंदाजे दुप्पट) वाढली आहे. दानाची रक्कम अचानक दुपटीने वाढल्यामुळे चोरीचे मूळ कुठे आहे, हे स्पष्ट होत असून या संपूर्ण घोटाळ्याचा पारदर्शक तपास व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.




