'संजय राऊत ४२०, गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही'; नितेश राणेंचा हल्लाबोल
मुंबई : पुण्यात १ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी, "तुम्ही मुळचे गुंड आहात, एकतर गुंडासारखे वागा नाहीतर गृहमंत्र्यांसारखे वागा," अशी खोचक टीका केली होती. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार पलटवार केला आहे.

"४२० ने गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये"
संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेताना नितेश राणे अत्यंत आक्रमक झाले. ते म्हणाले, "संजय राऊत ४२० आहे हेच आम्हाला म्हणावं लागेल. पत्रा चाळप्रकरणी जो जेलमध्ये जाऊन आलाय तो ४२० च आहे. आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही. खिचडी घोटाळ्यात पैसे खाणाऱ्या ४२० ने आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये."
उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा
संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नितेश राणे पुढे म्हणाले, "संजय राऊत यांचे मालक (उद्धव ठाकरे) जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा कोरोना काळात असंख्य लोकांचे जीव गेले. पत्रकारांवर खोट्या केसेस टाकण्यात आल्या आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी कधीच जनतेची माफी मागितली नाही. वास्तविक त्यांनी जनतेसमोर नाक रगडून माफी मागायला हवी होती, पण त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. हा सर्व संस्कारांचा विषय आहे. संजय राऊत यांनी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन हे सुसंस्कृतपणाचे सल्ले द्यावेत."
पंतप्रधान मोदींचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एका व्हिडिओवर बोलताना नितेश राणे म्हणाले, "पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईवर टीका झाली, तरीही त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही भारतीय म्हणून अभिमान वाटण्यासारखी आहे. आपल्या देशाचे नेतृत्व एका जबाबदार आणि सुसंस्कृत माणसाकडे आहे, ज्यांनी एक उत्तम आदर्श घालून दिला आहे."




