मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
मुंबई - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी "चलो मुंबई" चा नारा देत आझाद मैदानावर आंदोलन सुरु केलं असून, त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबई पोलीस यंत्रणेवरही ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांना शांततेचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी 10% आरक्षण जाहीर केलं होतं आणि आजही त्याचा लाभ समाजाला मिळतो आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी 'शिंदे समिती' कार्यरत असून लाखो नोंदी सापडल्या आहेत.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढं सांगितलं की, सारथी संस्थेमार्फत अनेक कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून हजारो मराठा तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्यात आलं असून, त्याची मर्यादा आता १५ लाखांपर्यंत वाढवली आहे. मराठा समाजासाठी शासनाने अनेक पावले उचलली आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरक्षण मिळालं होतं आणि ते उच्च न्यायालयात टिकलं देखील होतं. मात्र सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडी सरकारने प्रभावी भूमिका घेतली नाही, ही वस्तुस्थिती आहे.”
“आजही आमचं सरकार कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. कोणाचंही आरक्षण कमी न करता, कोणालाही नुकसान न होता हे दिलं जाईल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हीच आमची भूमिका आहे,” असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं.




