‘सखा माझा पांडुरंग’मध्ये संत सखुबाईंच्या भक्तिगाथेचं नवं पर्व; ८ वर्षांच्या लीपनंतर सान्वी जांबेकरची एंट्री

‘सखा माझा पांडुरंग’मध्ये संत सखुबाईंच्या भक्तिगाथेचं नवं पर्व; ८ वर्षांच्या लीपनंतर सान्वी जांबेकरची एंट्री

मुंबई (प्रतिनिधी) : सन मराठीवरील लोकप्रिय भक्तिमय मालिका ‘सखा माझा पांडुरंग’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, मालिकेतील संत सखुबाईंची भूमिका बालकलाकार स्वराली खोमणे हिने प्रभावीपणे साकारली. आता मालिकेत ८ वर्षांचा लीप घेतला जाणार असून, संत सखुबाईंच्या आयुष्यातील नव्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. या भूमिकेत अभिनेत्री सान्वी जांबेकर झळकणार आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला कलाकार, निर्माते संगीत कुलकर्णी आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. ४ जूनपासून दररोज सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांना संत सखुबाईंच्या भक्ती आणि संघर्षाचा नवा अध्याय पाहायला मिळणार आहे.

मालिकेचे निर्माते संगीत कुलकर्णी म्हणाले, “संत सखुबाईंची कथा ही केवळ भक्तीची नाही, तर धैर्य, श्रद्धा आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे. विठ्ठलावरील अढळ विश्वासाच्या जोरावर त्यांनी अनेक संकटांवर मात केली. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी उपलब्ध माहिती मर्यादित असल्याने ही कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ८ वर्षांच्या लीपनंतर सखुबाईंच्या आयुष्यातील नवे संघर्ष, त्यांची अधिक प्रगल्भ झालेली भक्ती आणि समाजासाठीचा त्यांचा लढा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.”

तर संत सखुबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्वी जांबेकर म्हणाली, “संत सखुबाईंसारखी प्रेरणादायी भूमिका साकारण्याची संधी मिळणं माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला आणि सखुबाईंच्या व्यक्तिरेखेला भरभरून प्रेम दिलं आहे, त्यामुळे ही भूमिका साकारताना माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. भूमिकेची तयारी करताना मी मालिकेचे आधीचे भाग अनेकदा पाहिले आणि सखुबाईंच्या स्वभावातील बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण टीमकडून मला उत्तम सहकार्य मिळत आहे. पहिल्याच भागाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक आव्हानात्मक प्रसंग अनुभवले, पण सखुबाईंच्या संघर्षमय जीवनाची जाणीव असल्याने त्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे. प्रेक्षकांनी छोट्या सखुवर जसं प्रेम केलं, तसंच प्रेम माझ्यावरही करतील, अशी अपेक्षा आहे.”