AI-जनरेटेड फेक व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप; काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबरमध्ये गुन्हा दाखल
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) DCP सुमित झा (DCP Sumit Jha) यांच्या नावाने AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0063/2026 नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. भाजप सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIRनुसार, @Bhaijagtap1 या X हँडलवरून दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचा भास निर्माण करणारा AI-जनरेटेड व्हिडिओ शेअर करण्यात आला. प्राथमिक पडताळणीत हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. समाजात संभ्रम निर्माण करणे आणि जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तो प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
भाजप नेते आणि पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, भाई जगताप यांनी जनतेची दिशाभूल केल्याबद्दल तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की, PIB Fact Check आणि दिल्ली पोलिसांनी आधीच स्पष्ट केले आहे की, DCP सुमित झा यांच्या राजीनाम्याचा दावा करणारा व्हिडिओ हा AI-जनरेटेड आणि पूर्णपणे बनावट आहे. अधिकृत यंत्रणांनी याबाबत नागरिकांना सावधही केले आहे. असे असतानाही भाई जगताप यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांनी तात्काळ संबंधित पोस्ट हटवून महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी.
नवनाथ बन पुढे म्हणाले, "जाणूनबुजून खोटी माहिती पसरवून समाजात संभ्रम निर्माण करणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. या प्रकरणात कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, मात्र फेक AI व्हिडिओच्या आधारे जनतेची फसवणूक कधीही स्वीकारली जाणार नाही."




