किडनीवर परिणाम, युरिन इन्फेक्शन, थोडा विसरण्याचा त्रास होऊ शकतो; अण्णा हजारेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून अपडेट

किडनीवर परिणाम, युरिन इन्फेक्शन, थोडा विसरण्याचा त्रास होऊ शकतो; अण्णा हजारेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून अपडेट

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. अण्णा हजारे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. गौतम भन्साळी यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना अण्णांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांची प्रकृती सुधारल्यास येत्या तीन-चार दिवसांत अण्णा हजारे यांना रुग्णालयातून घरी सोडले जाईल, असे डॉ. गौतम भन्साळी यांनी म्हटले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी अण्णा हजारे यांच्या प्रकृतीच्या अनेक समस्यांबाबतही माहिती दिली. 

अण्णा हजारे यांना सोमवारी रात्री साडेआठ वाजता रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना 3 ऑगस्टपासून व्हायरल इन्फेक्शन झाले होते. सिरीयल डिहायड्रेशन झाले आहे. बराच काळ व्हायरल इन्फेक्शन असल्याने त्यांना युरिन इन्फेक्शनही झाले आहे. तसेच व्हायरल इन्फेक्शन व लूज मोशनमुळे अण्णांच्या किडनीवर परिणाम झाला आहे. ते 91 वर्षांचे आहेत. त्यामुळे थोडा विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. परंतु, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. काळजी करण्याची गरज नाही. सगळ नीट असेल तर येत्या तीन-चार दिवसांत त्यांना डिस्चार्ज देता येईल, असे डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना प्रचंड खोकला, तीव्र ताप, अशक्तपणा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, असा त्रास होत होता. प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने आणि आजारपणामुळे ते अत्यंत अशक्त झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला होता.  अण्णा हजारे यांच्यावर आधी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धीजवळील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या एका विशेष पथकाने त्यांना रुग्णवाहिकेद्वारे मुंबईत आणण्यात आले होते. वयोमानामुळे आणि प्रकृतीच्या कारणांमुळे अण्णा हजारे गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना फारसे उपस्थित राहिलेले नाहीत. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. तीव्र डिहायड्रेशन, व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांच्यावर डॉ. गौतम भंसाली यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आत्ताच डॉ भंसाली यांच्याकडे त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ते स्टेबल आहेत असे त्यांनी सांगितले. अण्णांनी आयुष्यभर समाजासाठी संघर्ष केला. त्यांना लवकरात लवकर बरे वाटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी केली आहे.