एकनाथ शिंदेंची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजेरी; दिल्ली दौरा आणि नाराजीच्या चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?
मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला प्रत्यक्ष गैरहजर राहिल्याने ते ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काल ते भीमाशंकर दौऱ्यावर असल्याने त्यांना परतण्यास उशीर झाला का, की यामागे काही राजकीय नाराजी आहे, यावरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून ‘मराठी भाषेच्या मुद्द्यावरून’ दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये विसंवाद पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत या विषयावरून वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच एकनाथ शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेले एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामागे नेमकं कारण काय आहे, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, भारताचा GDP दर 7.8 टक्क्यांवर गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. याबाबत पोस्ट करत त्यांनी म्हटलं की, “जागतिक अनिश्चितता, युद्धाचे सावट आणि जागतिक मंदीचा दबाव असतानाही 7.8% चा जीडीपी विकास दर भारताची अदम्य आर्थिक ताकद दर्शवतो! या ऐतिहासिक कामगिरीबद्दल यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”“तुमच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांच्या जोरावर भारत प्रत्येक आव्हानावर मात करत वेगाने $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था आणि जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सशक्त नेतृत्व, समृद्ध भारत!” असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
याचदरम्यान, आगामी नवरात्रीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटातील एका बड्या नेत्याने केला आहे. या 14 आमदारांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर देण्यात आल्याची माहितीही शिंदेसेनेतील या नेत्याने दिली आहे.
सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे एकूण 20 आमदार आहेत. या 20 आमदारांपैकी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या 20 आमदारांपैकी नेमके कोणते 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांवर ‘ऑपरेशन टायगर’ची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याने दिली आहे. या 14 आमदारांपैकी 6 आमदारांना सरकारमध्ये चांगली खाती आणि मंत्रिपदं देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.यापैकी काही आमदारांची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहितीही समोर आली आहे. नवरात्रीपूर्वी या आमदारांचा पक्षप्रवेश झाल्यास ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.




