दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा मंत्री भुजबळांवर घणाघात
मुंबई - संपूर्ण राज्यभरात दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची आरास आणि आनंदाचे वातावरण सर्वत्र पसरले असताना राजकीय वर्तुळातही दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. मात्र, याच सणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय टीका - टिप्पणीही रंगताना दिसतेय. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारचं धोरण तात्पुरता आनंद देण्याचं आहे. शेतकऱ्यांना दिलं जाणारं पॅकेज केवळ आश्वासनांपुरतं मर्यादित आहे. प्रत्यक्ष मदतीऐवजी फसवणूक केली जात आहे. दिवाळीनंतर शेतकरी तज्ज्ञ आणि अभ्यासक यांच्याशी चर्चा करून कर्जमुक्ती, नुकसान भरपाई यांसारख्या मुद्यांवर निर्णय घेतला जाईल. सध्या शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. दिवाळीसारखा सणही दु:खात जातोय. त्यामुळे आता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असं आश्वासनही त्यांनी दिलं.
जरांगे पुढे म्हणाले, मी आजपर्यंत तायवाडे यांच्याविषयी काही बोललो नव्हतो, पण आता त्यांचं बोलणं इतकं खालच्या पातळीवर गेलं आहे की मला त्यांच्याबद्दल कीव येते. ज्याला कुत्रंही विचारत नाही, त्याच्या बोलण्याला तुम्ही महत्त्व देता का?" अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता इतर काही ओबीसी नेत्यांवरही टीकास्त्र सोडलं. आरक्षणासाठीचा जी.आर. रद्द होणार नाही, तो कायम राहणार आहे. मात्र भुजबळ समाजात भेदभाव निर्माण करत आहेत. ते मराठा समाजाला नादी लावत आहेत.
सणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या नेहमीच्या ठाम शैलीत सरकार, मंत्री भुजबळ आणि ओबीसी नेत्यांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.




