परदेशात फिरणं टाळा, विदेशात लग्नसोहळे करू नका, गरज असेल तरच सोनं खरेदी करा; पंतप्रधान मोदींचा देशवासियांना नवा कानमंत्र
मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत 7.8 टक्के विकासदर नोंदवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशवासियांना एक महत्त्वाचं आवाहन केलं.

देशाचा आर्थिक विकासदर सध्या चांगला आहे. ही गती कायम ठेवायची असेल तर आपल्याला ‘स्वदेशी’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दोन धोरणांचा अधिकाधिक अवलंब करावा लागेल. त्यासाठी परदेशातील प्रवास टाळा, विदेशात जाऊन लग्नसोहळे करणं टाळा, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. तसंच, गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, असंही त्यांनी सांगितलं.
भारतीय अर्थव्यवस्थेने 7.8 टक्के आर्थिक विकासदर नोंदवला आहे. यासाठी देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण देश आनंदाने भरून गेला आहे. हा जनतेच्या पुरुषार्थ, संकल्पशक्ती आणि सामूहिक शक्तीचा परिणाम आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.संपूर्ण जग युद्धाच्या परिस्थितीत आहे. चारही बाजूंनी संकटांच्या बातम्या येत आहेत. जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कोरोनानंतर जगभरात कुठेही स्थिरता नाही. तरीही भारत इतक्या वेगाने प्रगती करत आहे.
भारतामधील निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक ‘झूठ की गूंज’च्या माध्यमातून चारही दिशांना अपप्रचार करत आहेत. मात्र, या सगळ्या परिस्थितीवर मात करत आणि निराशेचं वातावरण भेदून भारतीय अर्थव्यवस्थेने 7.8 टक्के आर्थिक विकासदर नोंदवला आहे. ही गती कायम राखायची असेल तर आपल्याला आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या दोन धोरणांचा आग्रहाने अवलंब करावा लागेल, असं मोदींनी म्हटलं.
आपण जितक्या मोठ्या प्रमाणात स्वदेशी वस्तूंचा वापर करू आणि आत्मनिर्भर होऊ, तितका 2047 मध्ये चांगल्या भारताची निर्मिती होईल. त्यासाठी आपल्या पुरुषार्थात कोणतीही कमतरता राहता कामा नये. आपली नीती आणि नियत साफ आहे. 140 कोटी जनतेची ही शक्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
याचा आनंद साजरा करा आणि त्यासोबत संकल्पही करा. हा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी माझ्यासोबत चला, अशी भावनिक सादही पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना यावेळी घातली.अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे खनिज तेलाचे दर भडकल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हान निर्माण झालं होतं. मात्र, या सर्व आव्हानांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली. गेल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीत देशाचा ढोबळ राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वृद्धीदर 7.8 टक्के राहिला आहे.




