PM मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ व्हायरल; रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण सत्य काय?
मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलगी रेवती सुळे यांच्या विवाह स्वागत समारंभाला हजेरी लावली.या कार्यक्रमात अमित शाह आणि पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्यासोबत बसलेले दिसले. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हेही उपस्थित होते.

दरम्यान, या कार्यक्रमात मोदी आणि शाह यांची शरद पवारांसोबत झालेली भेटही राजकीय चर्चेचा विषय ठरली. दुसरीकडे, याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमनेसामने आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
हा व्हिडिओ रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात हा व्हिडिओ या कार्यक्रमातील नसल्याचं समोर आलं आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी हे प्रियांका आणि राहुल गांधी यांच्या समोर येताना दिसतात. यावेळी मोदी यांनी “प्रियांकाजी, तुम्ही कशा आहात?” अशी विचारणा केली.
यानंतर प्रियांका गांधी यांनी हसत “मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात?” अशी विचारपूस केली. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी “मी तर आहे तसाच आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.मोदींची ही प्रतिक्रिया ऐकून मल्लिकार्जुन खरगे यांनी टायमिंग साधत “भाई साहब थोड़ा सा बदल गए हैं,” अशी कोपरखळी मारली. यावेळी मोदी यांनाही हसू आवरलं नाही. त्यांनी खरगेंना टाळी देत “अच्छा!” अशी प्रतिक्रिया दिली.
हा व्हिडिओ सध्या रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमधील असल्याचं सांगत शेअर केला जात आहे. मात्र, हा व्हिडिओ जुना असून रेवती सुळे यांच्या स्वागत समारंभातील नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे व्हायरल दाव्यांमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.दुसरीकडे, रेवती सुळे या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि शरद पवार यांच्या नात आहेत. रेवती सुळे यांचा विवाह सारंग लखानी यांच्याशी झाला आहे.
स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आणि शरद पवार यांच्यासोबतच्या त्यांच्या संवादाचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. शरद पवार यांनी स्वतः पाहुण्यांचं स्वागत केलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, त्यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका गांधी हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दरम्यान, रेवती सुळे यांच्या स्वागत समारंभापूर्वी सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या आठ सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ही भेट सुमारे 20 मिनिटे चालली.त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली. यापूर्वी 22 जुलै रोजी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.




