'मिसिंग लिंक'वर एक पैशाचाही धोका नाही; टीकाकार महाराष्ट्रद्रोही, एकनाथ शिंदेंचा पलटवार
मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं म्हणजे केवळ आमची, सरकारची किंवा मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही, तर ती संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी आहे. आज 'मिसिंग लिंक' पाहण्यासाठी केवळ देशातूनच नव्हे, तर विदेशातूनही लोक येत आहेत. अशा महत्त्वाच्या प्रकल्पाची ज्या प्रमाणात बदनामी केली जाते, ती कदाचित महाराष्ट्राचे शत्रूही करत नसतील. लोकशाहीत विरोधी पक्षातील सदस्य, काही नेते किंवा इतर व्यक्ती टीका करू शकतात; मात्र महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांची विनाकारण बदनामी करणाऱ्यांना आपण काय म्हणणार? राज्यात राहून महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करणारे हे महाराष्ट्रद्रोहीच आहेत. हा महाराष्ट्रद्रोहच आहे. कोणताही प्रकल्प बदनाम झाला, तर त्याचा फटका महाराष्ट्राच्या प्रतिमेला बसतो; तो एखाद्या मुख्यमंत्र्याचा, मंत्र्यांचा किंवा पदाधिकाऱ्याचा वैयक्तिक प्रश्न नसतो. त्यामुळे टीका करताना तारतम्य राखणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत व्यक्त केली.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना शिंदे म्हणाले की, 'मिसिंग लिंक' हा एक अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत नमुना (Engineering Marvel) आहे. या प्रकल्पात एकाही पैशाचा अपव्यय झाला नाही आणि वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. काहींनी मात्र "मिसिंग लिंक कोसळला" असा गाजावाजा केला. प्रत्यक्षात संपूर्ण प्रकल्प कोसळला नव्हता, तर कमानीचा एक भाग प्रभावित झाला होता. किमान वस्तुस्थितीची पडताळणी करून तरी बोलायला हवे होते, असा टोला त्यांनी लगावला.
या प्रकल्पाची मंजूर किंमत 6,695 कोटी रुपये होती, तर प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये झाला. म्हणजेच खर्चात केवळ 7.26 टक्क्यांची वाढ झाली, जी मंजूर रकमेच्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 40 मिनिटांनी कमी झाला असून, पुढे सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. दररोज जवळपास एक कोटी रुपयांचे इंधन वाचत असून, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीही कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे यांनी अटल सेतूच्या संदर्भातील आरोपांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, यापूर्वी अटल सेतूबाबतही "सेतू उखडला" असा अपप्रचार करण्यात आला होता. प्रत्यक्षात मुख्य पुलाला काहीही झाले नव्हते; केवळ सर्व्हिस अप्रोच रोडवर एक भेग पडली होती. आज अटल सेतूवरून दररोज 30 हजारांहून अधिक वाहने प्रवास करत आहेत.
मुंबईतील रस्त्यांच्या विकासकामांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शहरातील रस्त्यांची एकूण लांबी 2,050 किलोमीटर आहे. मेगा सीसी रोड प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 575 किलोमीटर रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरात तब्बल 1,913 किलोमीटर लांबीचे काँक्रीट रस्ते असतील. या काँक्रीटीकरणामुळे दरवर्षी खड्डे दुरुस्तीसाठी होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याचाही त्यांनी दावा केला.




