केआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास; १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्थानिक के.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने (स्वायत्त) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्लेसमेंट क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यंदा १५७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी कॅम्पस ड्राईव्हमध्ये भाग घेत ६५२ हून अधिक विद्यार्थ्यांची विक्रमी निवड केली. यामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६.५० लाख, तर सर्वोच्च २७.५० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा पॉवर, बेंटली सिस्टिम्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी विद्यार्थ्यांवर विश्वास दाखवला. आयटी क्षेत्रासोबतच मेकॅनिकल, सिव्हिल, पर्यावरण आणि बायोटेक्नॉलॉजी या कोअर शाखांतील विद्यार्थ्यांनीही आकर्षक पॅकेजेस मिळवून आपली छाप पाडली. महाविद्यालयात दुसऱ्या वर्षापासूनच दिले जाणारे कौशल्यविकास, मॉक इंटरव्ह्यू आणि उद्योगसुसंगत प्रशिक्षण या यशामध्ये महत्त्वपूर्ण ठरले.
या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली आणि संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी आनंद व्यक्त करत हा विक्रम संस्थेच्या गुणवत्तेचा पुरावा असल्याचे सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले आणि सर्व प्रशासकीय मंडळाने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




