मालिका-चित्रपटांच्या सेटवरील निकृष्ट जेवणाचा मुद्दा ऐरणीवर; तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मराठी, हिंदी आणि विविध भाषांतील मालिका, चित्रपट तसेच वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार आणि तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाचे अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, राज्यातील मुंबई, पुणे, नाशिकसह विविध भागांमध्ये सुरू असलेल्या चित्रीकरणांदरम्यान हजारो कलाकार, तंत्रज्ञ आणि सहाय्यक कर्मचारी काम करतात. मात्र, अनेक शूटिंग लोकेशन्सवर पुरविण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
अनेक ठिकाणी अस्वच्छ, आरोग्यास अपायकारक आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारे अन्न दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सलग १२ ते १६ तास काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना स्वच्छ, सुरक्षित व पौष्टिक अन्न मिळणे ही निर्मिती संस्था आणि केटरिंग सेवा पुरवठादारांची जबाबदारी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर अन्नाच्या गुणवत्तेची विशेष तपासणी करण्यात यावी, अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत आहे का याची पडताळणी करावी आणि नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बाबासाहेब पाटील यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही काळापासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर या मागणीकडे आता लक्ष लागले आहे.




