‘गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?’; मेधा कुलकर्णींचं गणेशोत्सवावर रोखठोक भाष्य

‘गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?’; मेधा कुलकर्णींचं गणेशोत्सवावर रोखठोक भाष्य

पुणे (प्रतिनिधी) : गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सवांना सध्या जे काही विडंबनात्मक स्वरूप आलं आहे, त्याचा आवाजाचा त्रास अनेकांना होतो. यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतंय, प्राणीमात्रांना त्रास होतोय, तसंच मनुष्यप्राण्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय. घरात असलेल्या आजारी आणि वृद्ध व्यक्तींनाही मोठ्या आवाजाचा त्रास होतो.

दहीहंडी, नवरात्र आणि इतर उत्सवांच्या वेळी जो काही धिंगाणा चालतो, त्यावर निर्बंध घातलेच पाहिजेत. आता इथे गौतमी पाटीलला बोलावण्यात आलं आहे. "याच्यात कुठली धार्मिकता आहे? तुम्ही या अर्धनग्न अवस्थेमध्ये जर महिला इथे येऊन अंगविक्षेप करत असतील, तर हे कृष्णाला तरी आवडणार आहे का? गणपतीला तरी आवडणार आहे का?" अशी रोखठोक भूमिका भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडली आहे.

दरम्यान, नियम सर्वांसाठी समान आहेत. यामध्ये कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा संबंध नाही. कोणत्याही जयंत्या, पुण्यतिथ्या, सण-वार किंवा कोणत्याही धर्माचे उत्सव असोत, रस्त्यावर येऊन धांगडधिंगा केल्यावरच त्याला धार्मिकता प्राप्त होते, असं मला वाटत नाही, असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं.काही उत्सवांनी आता विकृत स्वरूप धारण केलं आहे, असं मला वाटतं. याला मी धार्मिकता मानत नाही. मी आस्तिक आहे. मी स्वतः देव, देश आणि धर्म मानणारी व्यक्ती आहे. वेळोवेळी धर्माच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून काम करणारी प्रतिनिधी आहे. तरीसुद्धा मी या प्रकाराच्या विरोधात आहे.

"गौतमी पाटीलला घेऊन जर तुम्ही धिंगाणा घालत असाल, तर तुम्ही श्रीकृष्णाची नीतीच ओळखलेली नाही. श्रीकृष्णाचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत. ते पहिले पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा अवलंब केला पाहिजे," असंही भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं.नवरात्रीमध्ये देवीची उपासना करण्याऐवजी तुम्ही दांडिया करताय आणि तिथे घाणेरड्या अर्थाची गाणी वाजवताय. ज्या देवी घराघरांमध्ये आहेत आणि आजारी तसेच थकून घरी आलेले नागरिक आहेत, त्यांना तुम्ही स्वतःच्या घरात राहू देणार नाही का? हा कुठला प्रकार आहे? तुम्हाला निर्बंध नको आहेत, पण इतरांना बंधनं पाळावी लागतात ना.

स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की केवळ तुम्हालाच स्वातंत्र्य आहे. संविधानात स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की आपल्या कोणत्याही अधिकारामुळे दुसऱ्याच्या अधिकारांची पायमल्ली होऊ नये. अशा पद्धतीने आपण दुसऱ्याच्या अधिकारावर गदा आणत असू, तर ते चुकीचं ठरतं, असं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवाजाचा त्रास नागरिकांना होत असेल आणि तो होतच आहे, तर तो टाळला पाहिजे. गणेश मंडळांसोबतच लोकप्रतिनिधींनाही माझं आवाहन आहे की पुणेकर नागरिकांना मोठ्या आवाजामुळे खूप त्रास होतोय.

सोसायट्यांमध्ये, गावातील कंजेस्टेड भागांमध्ये आणि बाहेरील परिसरातही मोठ्या संख्येने गणेशोत्सव मंडळं झाली आहेत. मोठ्या आवाजात वेगवेगळ्या प्रकारची अश्लील गाणी लावणं योग्य नाही. DJ, प्लाझ्मा आणि नव्याने आलेल्या मोठ्या साऊंड सिस्टिममुळे नागरिकांना मोठा त्रास होतो. त्यामुळे हे सगळं बंद करून आपण अतिशय धार्मिक आणि संयमित पद्धतीने सण साजरे केले पाहिजेत, असं आवाहनही मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.