बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, पुनरावृत्ती करणाऱ्यांवर 'मोक्का' लावा – डॉ. नीलम गोऱ्हे
कोल्हापूर/प्रतिनिधी: पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि नगर या जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर गर्भपाताची जाळी पसरली असल्याचे उघडकीस आल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. कोल्हापूर येथे पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि सिव्हिल सर्जन यांच्यासोबत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

बेकायदेशीर प्रकरणांवर कुणाचीही गय केली जाणार नाही
माजी जिल्हा शल्यचिकित्सकासह अनेक संशयित बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात सहभागी असल्याचे आढळले असून, आतापर्यंत ३०० हून अधिक गर्भपात झाल्याचे तपासात समोर आले आहे. यावर बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "निवृत्त डॉक्टरांनी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांनी असे बेकायदेशीर कृत्य केले असेल, तर कोणालाही माफी मिळणार नाही. या गुन्हेगारी रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे बारकाईने तपास करावा."
पुनरावृत्ती करणाऱ्यांवर 'मोक्का' लावण्याचे निर्देश
एकापेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये आढळणाऱ्या आणि वारंवार असा गुन्हा करणाऱ्या आरोपींवर 'मोक्का' (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, पशुवैद्यकीय सोनोग्राफी मशिनचा गैरवापर, फिरत्या वाहनांचा वापर आणि कम्पाउंडरमार्फत होणारे बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी एकत्र प्रयत्नांची गरज
न्यायालयीन प्रक्रियेत आरोपींना मिळणारा जामीन आणि प्रलंबित खटल्यांवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, "न्यायालयाने आरोपींची पोलीस कस्टडी आणि जामीन यावर अधिक गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकील आणि पोलिसांनी भक्कम पुरावे सादर करून दोषसिद्धीचे (Conviction Rate) प्रमाण वाढवले पाहिजे."
तसेच, पीडितांची गुप्त माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे गुप्त ठेवून कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.




