NEET पेपरफुटीचा भडका! धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होणार?

NEET पेपरफुटीचा भडका! धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होणार?

मुंबई (प्रतिनिधी) : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून राजधानी दिल्लीत सध्या प्रचंड राजकीय आणि सामाजिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस असताना, संसदेबाहेर आंदोलक आणि पोलिसांमध्ये तीव्र धुमश्चक्री पाहायला मिळाली. या सर्व नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतून एक सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे तडकाफडकी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. आंदोलकांची मुख्य मागणी ही शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची असल्याने, या हाय-व्होल्टेज बैठकीत धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) आज संसदेवर धडक मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, पोलिसांनी केवळ केरळ भवनापर्यंतच मोर्चाला परवानगी दिल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शीघ्र कृती दलाच्या (RAF) जवानांनी आंदोलकांवर थेट लाठीमार केला. संसदेच्या आत आणि बाहेर या मुद्द्यावरून सरकारची कोंडी होत असतानाच, धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. "केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना जरा तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल, तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी आधीच राजीनामा दिला असता, तर देशातील तरुणांवर रस्त्यावर उतरण्याची आणि मार खाण्याची वेळ आली नसती. काल मुंबईत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केले, आता देशभरातील तरुण रस्त्यावर उतरत आहेत. तुम्ही जितक्या बळाचा वापर कराल, तितकीच तीव्र प्रतिक्रिया उमटेल हे सरकारने लक्षात ठेवावे."

खासदार सावंत यांनी इतिहासाचा दाखला देत केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणावरही निशाणा साधला. "आंदोलकांशी चर्चा करायला सरकारला नक्की काय अडचण आहे? भूतकाळात इंदिरा गांधी यांनी सोनम वांगचुक यांच्या वडिलांशी चर्चा करून, त्यांना पाणी पाजून आंदोलन मागे घ्यायला लावले होते. आज २० ते २२ दिवस झाले तरी हे सरकार चर्चा करायला तयार नाही. आज अधिवेशनातही आम्ही याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. देशाचे भविष्य असलेल्या तरुणांना अशा पद्धतीने तुडवले जाणे अत्यंत निषेधार्ह आहे," असे संतप्त उद्गार सावंत यांनी काढले.

धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांच्यातील या बैठकीनंतर सरकार काय मोठा निर्णय घेणार, याकडे आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.