वडिलांच्या राजकीय निर्णयाचा मुलाला फटका! कृष्णा आष्टीकरांचा दारुण पराभव, ठाकरे गटातूनही हकालपट्टी

वडिलांच्या राजकीय निर्णयाचा मुलाला फटका! कृष्णा आष्टीकरांचा दारुण पराभव, ठाकरे गटातूनही हकालपट्टी

मुंबई (प्रतिनिधी) : नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमर राजुरकर यांनी दणदणीत विजय मिळवत ठाकरे गटाचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. विशेष म्हणजे, कृष्णा आष्टीकर यांना केवळ 84 मतांवर समाधान मानावं लागलं.भाजपचे अमर राजुरकर यांना 339 मतं मिळाली, तर कृष्णा आष्टीकर यांना अवघी 84 मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत 23 मतं बाद झाली.

कृष्णा आष्टीकर हे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र आहेत. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्याचा परिणाम या निवडणुकीवर झाल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीतील मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.सुरुवातीला काँग्रेसचे रामदास पाटील सोमठाणकर निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात त्यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीने कृष्णा आष्टीकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला होता. तरीही अपेक्षित मतांचा पाठिंबा त्यांना मिळू शकला नाही.

दरम्यान, निकालानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कृष्णा आष्टीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली. पक्षविरोधी भूमिका आणि कारवायांचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.विशेष म्हणजे, निवडणुकीतील पराभवानंतर कृष्णा आष्टीकर यांनी आपण वडिलांच्या विरोधात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच हिंगोलीतून येणाऱ्या आपल्या वडिलांचे नांदेड विमानतळावर जंगी स्वागत करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे नांदेडच्या राजकारणात आता पुढे कोणते नवे समीकरण तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.