मोशी दुर्घटनेत रात्रभर थरार! ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या शोधासाठी जवानांची जीवाची बाजी
मुंबई (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पातील प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्यानंतर बचावकार्य अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे. तळमजल्यासह तीन मजली असलेल्या या इमारतीत दुर्घटनेच्या वेळी 23 कामगार उपस्थित होते. त्यापैकी काहींना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित कामगारांचा शोध सुरू आहे.

बचावकार्यादरम्यान मध्यरात्री जवानांनी अत्याधुनिक 'साउंड व्हायब्रेशन टेस्ट' करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींकडून काही हालचाल किंवा जीवनाची चिन्हे मिळतात का, याची पडताळणी केली. मात्र, या चाचणीत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समोर आली.
यानंतर सलग अनेक तास जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने कचऱ्याचा प्रचंड ढिगारा हटवण्यात आला. आज सकाळी जवानांनी पहिल्या मजल्याच्या भिंतीला मोठे छिद्र पाडून थेट कॅन्टीनमध्ये प्रवेश केला. अनेक कामगार कॅन्टीन किंवा तळमजल्यावरील पार्किंगमध्ये अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक भागाची काळजीपूर्वक तपासणी सुरू आहे.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देत रात्रभर परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे कचरा डेपोतील पाणी इमारतीत शिरल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. काही अडकलेल्या कामगारांपर्यंत बचाव पथक पोहोचले असून त्यांना चहा आणि बिस्किटे देण्यात आली आहेत. मात्र, त्यांच्या पायांवर काँक्रीटचा पिलर अडकल्यामुळे त्यांना तातडीने बाहेर काढणे शक्य झालेले नाही.सर्व अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणा शर्थीने प्रयत्न करत असून, बचावकार्य अजूनही अविरत सुरू आहे.




