ड्युटीवर सर्व्हिस पिस्तूल बाळगणे अनिवार्य; विश्वास नांगरे पाटलांचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी : नागपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शहरातील वाहतूक पोलिसांसह सर्व पात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना अधिकृत सर्व्हिस पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हर सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश संपूर्ण पोलीस दलाला जारी करण्यात आले आहेत.

शहरातील नाकाबंदी, विशेष तपासणी मोहिमा आणि ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईदरम्यान अनेकदा पोलिसांना आक्रमक नागरिक किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना सामोरे जावे लागते. काही घटनांमध्ये पोलिसांवर हल्ले झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या आत्मसंरक्षणासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशाचा फक्त वाहतूक पोलिसांपुरता मर्यादित परिणाम नसून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनाही त्यांची अधिकृत सर्व्हिस पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हर ड्युटीदरम्यान सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे पोलिसांची सुरक्षितता वाढण्यासोबतच गुन्हेगारांवर कायद्याचा अधिक प्रभाव पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना शिस्त, स्वच्छ गणवेश आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन यावर भर देण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता त्यात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व्हिस शस्त्र बाळगणे अनिवार्य करण्यात आल्याने नागपूर पोलीस दलाची सज्जता आणखी बळकट होणार आहे.




