‘जे ठाकरेंचे होऊ शकले नाहीत, ते जरांगेंचे कसे होतील?’; बंडू जाधवांवर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

‘जे ठाकरेंचे होऊ शकले नाहीत, ते जरांगेंचे कसे होतील?’; बंडू जाधवांवर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटातून शिंदेसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी आयोजित केलेला शेतकरी मेळावा रद्द करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. मात्र, तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या घडामोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडू जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाचं नेतृत्व करतात. ते प्राण पणाला लावून लढत आहेत. सतत उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खूप खालावली आहे, हे मी स्वतः पाहिलं आहे. मध्यंतरी त्यांचे चिरंजीव हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी त्यांना सांगितलं होतं की, सारखं आंदोलन आणि उपोषण करून आपल्या प्रकृतीची वाट लावू नका."

"मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यात उपोषणाला बसलेले असताना आणि वातावरण तापलेलं असताना परभणीच्या खासदारांनी उपमुख्यमंत्र्यांना बोलावून जो मेळावा घेतला, तो टाळावा अशी जरांगे पाटलांची भूमिका होती. समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात त्यांची ती भूमिका होती. त्यांची तळमळ आणि तडफड मीसुद्धा काल पाहिली. कारण बंडू जाधव यांना निवडून आणण्यासाठी जरांगे पाटलांची फार मोठी मदत झाली, हे सत्य आहे. त्यामुळे जरांगेंनी अपेक्षा केली असेल की, एवढा त्याग तुम्ही करा, तर त्यांनी तो करायला हवा होता," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत पुढे म्हणाले की, "बंडू जाधव हे कोण आहेत? त्यांनी इतकी वर्षं ठाकरेंकडे सत्ता भोगली, पण ते ठाकरेंचे होऊ शकले नाहीत. सर्व पदं भोगली. ते मनोज जरांगे यांचे कसे होतील? ते नवीन नवीन आई-बाप शोधत असतात, असं दिसत आहे. पण आता त्यांच्यामध्ये काय होतं ते बघू, कारण हा शेवटी अंतर्गत लढा आहे.""या खासदाराची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी ठाकरेंशी गद्दारी केली. जो माणूस ठाकरेंचा होऊ शकत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना धडा शिकवण्याची भूमिका घेतलेली आहे. मला त्यांचा स्वभाव माहिती आहे, ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. धडा आम्ही देखील शिकवू. जे सगळे गद्दार गेले आहेत, ते पुन्हा संसदेत जाणार नाहीत, याची व्यवस्था शिवसैनिकांनी केलेली आहे," असेही संजय राऊत यांनी म्हटले.

आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "आरक्षण विषयावर मुख्यमंत्री कुंपणावर बसून आहेत. त्यांनी कधीही मार्ग काढलेला नाही. उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही चर्चा करू, ते ज्युनियर मंत्री पाठवतात चर्चा करायला. बाकी सगळ्या गोष्टीत तुमचं गांभीर्य आहे, पण मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष दिलं पाहिजे.''पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला आरक्षण देणार होते, काय झालं त्याचं? ते वाद घडवतात. निवडणूक आली की आश्वासन देतात आणि पुन्हा विसरतात," अशी टीकाही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.