वाद मिटवण्याच्या बहाण्याने शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील ‘त्या’ हत्येचं धक्कादायक कारण समोर

वाद मिटवण्याच्या बहाण्याने शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील ‘त्या’ हत्येचं धक्कादायक कारण समोर

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील गोसावीवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सुमित अरुण पगारे असं मृत तरुणाचं नाव असून, रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत कारवाई करत 12 संशयितांना अटक केली आहे.

या प्रकरणी सुमित भाटिया यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुमित पगारे, सुमित भाटिया आणि आकाश बोर्डे हे तिघे गोसावीवाडीतील टिळे हॉस्पिटलसमोरील गंगोत्री जनता स्टोअर येथे पानमसाला खरेदी करण्यासाठी गेले होते.याचवेळी 14 जणांचा एक गट तिथे आला. त्यांनी जुन्या वादाचा मुद्दा उपस्थित करत तिघांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही क्षणांतच या वादाचं रूप हिंसक हल्ल्यात बदललं.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, राजिक शेख याने सुमित पगारेला ‘आपल्यातील वाद कायमचा मिटवू’ असं सांगत हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा केवळ बहाणा असल्याचं समोर आलं. हात मिळवत असतानाच राजिक शेख याने कमरेला लावलेलं पिस्तूल बाहेर काढलं आणि सुमित पगारेच्या पोटावर सलग दोन गोळ्या झाडल्या.अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुमित पगारेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे आणि नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झालं.हत्येनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रं हाती घेतली. गोसावीवाडी परिसरात दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात 14 संशयितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 12 संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.तर मुख्य गोळीबार करणारा संशयित आणि आणखी एका आरोपीचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. या हत्येमागे नेमकं काय कारण होतं आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.