जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेत विचारले जाणार 40 प्रश्न, पाहा संपूर्ण यादी

जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेत विचारले जाणार 40 प्रश्न, पाहा संपूर्ण यादी

मुंबई (प्रतिनिधी) : देशात होणाऱ्या आगामी जनगणनेबाबत केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील, म्हणजेच लोकसंख्या गणनेसाठी 40 प्रश्नांची यादी जारी केली आहे. विशेष म्हणजे, यंदाची जनगणना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या इतिहासात प्रथमच जातीनिहाय आकडेवारीही गोळा केली जाणार आहे. याशिवाय, ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी डिजिटल जनगणना असणार आहे.

जनगणनेत कोणते 40 प्रश्न विचारले जाणार? 

तुमचे नाव काय आहे?

कुटुंबप्रमुखाशी तुमचे नाते काय आहे?

तुमचे लिंग काय आहे? (पुरुष/महिला/इतर)

तुमची जन्मतारीख आणि पूर्ण वर्षांतील वय किती आहे?

तुम्ही विवाहित आहेत का?

विवाहाच्या वेळी तुमचे वय (पूर्ण वर्षांमध्ये) किती होते?

तुमच्या पती/पत्नीचे नाव काय आहे?

तुमचे राष्ट्रीयत्व कोणते?

तुमचा धर्म कोणता आहे?

तुम्ही अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) किंवा इतर कोणत्या जातीचे आहात?

तुमच्या वडिलांचे नाव काय?

तुमच्या आईचे नाव काय?

तुम्ही कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगत्वाने प्रभावित आहात का?

तुमची मातृभाषा कोणती आहे आणि तुम्हाला इतर कोणत्या भाषा येतात?

तुम्ही शिकलेले आहात का? डिजिटल साक्षर (संगणक/मोबाईल) आहात?

तुम्ही सध्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहात का?

तुमची सर्वोच्च शैक्षणिक पात्रता काय आहे आणि तुमचा विषय/शाखा कोणती होती?

गेल्या वर्षात अर्थार्जनासाठी तुम्ही काम केलं का?

तुम्ही अर्थार्जनासाठी कोणतं काम करता?

तुमचा मुख्य व्यवसाय किंवा पेशा कोणता आहे?

तुमच्या कामाचं/व्यवसायाचं उद्योग, व्यापार किंवा सेवा यापैकी कोणतं स्वरुप/श्रेणी आहे?

कामाच्या आधारावर तुमची श्रेणी कोणती आहे? (उदा. नियोक्ता, कर्मचारी, स्वयंरोजगार इ.)

तुम्ही कामगार नसल्यास तुमचं उत्पन्नाचं स्त्रोत काय आहे?

तुम्ही काम करत नसल्यास, तुम्ही कामाच्या शोधात आहात का किंवा कामासाठी उपलब्ध आहात का?

तुम्ही कामाच्या ठिकाणी कशाप्रकारे प्रवास करता आणि किती अंतर कापता?

तुमचे जन्मस्थान कुठे आहे?

या ठिकाणापूर्वी तुमचे शेवटचे निवासस्थान कोणते होते?

निवासस्थान बदलण्याचे (स्थलांतराचे) मुख्य कारण काय होते?

शेवटचे निवासस्थान बदलल्यानंतर तुम्ही या गावात/शहरात किती काळापासून राहत आहात?

तुमचा कायमस्वरूपी निवासी पत्ता काय आहे?

सध्या तुमची किती मुलं आहेत? (केवळ विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी)

तुमची एकूण किती मुलं जिवंत जन्माला आली होती? (केवळ विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी)

गेल्या एका वर्षात तुम्ही किती मुलांना जन्म दिला? (केवळ विवाहित महिलांसाठी)

तुम्ही कोविड-19 चे लसीकरण कुठे करून घेतले?

तुमची एकूण किती बँक खाती आहेत?

तुमचा मोबाईल क्रमांक काय आहे? (उपलब्ध असल्यास)

तुमचा आधार क्रमांक काय आहे? (उपलब्ध असल्यास)

तुमचा मतदार ओळखपत्र (Voter ID) क्रमांक काय आहे? (उपलब्ध असल्यास)

तुमचा पासपोर्ट क्रमांक काय आहे? (भारतीय पासपोर्टधारक असल्यास)

तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का?

लडाख तसेच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील बर्फाच्छादित भागांमध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत लोकसंख्या गणना केली जाणार आहे. घराघरात जाऊन गणना सुरू होण्यापूर्वी 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान नागरिकांना स्वतः ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध असेल. देशातील उर्वरित भागांमध्ये लोकसंख्या गणना पुढील वर्षापासून सुरू होणार आहे.

यंदाच्या जनगणनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे देशातील लोकसंख्येची रचना, सामाजिक स्थिती आणि इतर महत्त्वाची माहिती यांचा आधुनिक आणि सविस्तर डेटाबेस तयार होण्यास मदत होणार आहे.