मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? जाणून घ्या A to Z माहिती

मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? जाणून घ्या A to Z माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या कर्जमाफीची प्रक्रिया जोरात सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते आणि सध्या त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसमोर कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्हाला काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

सर्वात आधी संबंधित शेतकऱ्याचे नाव कर्जमाफी योजनेत असणे बंधनकारक आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आणि केवायसी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर सरकारकडून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

पण मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काही प्रक्रिया करावी लागणार आहे. सर्वात आधी कर्जमाफीच्या यादीत नाव आहे का, हे तपासावे लागेल. त्यानंतर यादीत नाव असल्यास बँकेत जाऊन काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

यामध्ये तुम्हाला,

* शेतकऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र

* वारस प्रमाणपत्र

* मृत शेतकऱ्याचे आधार कार्ड

* बँक पासबुक

* विशिष्ट क्रमांक

* कर्जखाते क्रमांक आणि अकाउंट नंबर

* तसेच एक अर्ज जमा करावा लागणार आहे.

यासोबतच मयत शेतकऱ्याची जमीन ज्या व्यक्तीच्या नावावर असेल, त्या व्यक्तीच्या खात्याची माहिती देणेही बंधनकारक आहे. त्याचीदेखील आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

त्यामध्ये तुम्हाला,

* ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे त्याचा फार्मर आयडी

* आधार कार्ड आणि पॅन कार्ड

* मोबाईल क्रमांक

* आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अर्जावर सही किंवा अंगठा द्यावा लागणार आहे.

यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. सध्या राज्यात सुमारे 50 हजार शेतकरी मयत आहेत, ज्यांच्या नोंदी अद्ययावत झालेल्या नाहीत.

ही सर्व कागदपत्रे शाखा व्यवस्थापकाकडे जमा करावी लागणार आहेत. मात्र, लक्षात ठेवा, सध्या ज्या शेतकऱ्यांची e-KYC पूर्ण झाली आहे, अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. मयत शेतकऱ्यांच्या e-KYC ची प्रक्रिया बँकेमार्फत केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांच्या कुटुंबीयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.