सहा महिने झाले, पण सत्य अजूनही समोर नाही; विमान दुर्घटना चौकशीवर युगेंद्र पवारांचा संताप

सहा महिने झाले, पण सत्य अजूनही समोर नाही; विमान दुर्घटना चौकशीवर युगेंद्र पवारांचा संताप

पुणे (प्रतिनिधी) : दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण झाले असतानाही चौकशीचा अंतिम अहवाल समोर न आल्याने युगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.युगेंद्र पवार म्हणाले, अजित दादांना जाऊन सहा महिने झाले, पण या दुर्घटनेचं खरं कारण अजूनही समोर आलेलं नाही. सुरुवातीचा प्राथमिक अहवाल आम्हाला समाधानकारक वाटलेला नाही. त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.

ते पुढे म्हणाले, "आम्ही आतापर्यंत संयम बाळगला. दुसरा अहवाल येईल, सत्य समोर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र इतका काळ उलटूनही तपासाचा स्पष्ट निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे बारामतीतील नागरिकांच्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत."युगेंद्र पवार यांनी तपास यंत्रणांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित करत, "सीआयडी, डीजीसीए आणि इतर यंत्रणा चौकशी करत असतील, तर इतका विलंब का होत आहे? त्या दिवशी नेमकं काय घडलं, याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे. संबंधित सीसीटीव्ही फुटेजसह सर्व तथ्य समोर आणावीत," अशी मागणी केली.

तसेच, "आता आमचा संयम सुटत चालला आहे. बारामतीकरांना आणि कुटुंबीयांना या दुर्घटनेबाबत स्पष्ट उत्तरं हवी आहेत. तपास यंत्रणांनी लवकरात लवकर पुढील अहवाल सादर करून सत्य जनतेसमोर मांडावे," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.यावेळी शरद पवार यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत विचारले असता, युगेंद्र पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठीच ही भेट झाली होती आणि त्यानंतर केंद्र सरकारने त्यासंदर्भात पावले उचलल्याचेही त्यांनी नमूद केले.