उद्धव ठाकरे गटातील राजकीय घडामोडींना वेग; खासदारांच्या भूमिकेनंतर मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटची चर्चा

उद्धव ठाकरे गटातील राजकीय घडामोडींना वेग; खासदारांच्या भूमिकेनंतर मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदारांच्या भूमिकेमुळे पक्षातील हालचालींना नवे वळण मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या एका ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार असून त्यापैकी काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींमुळे पक्षातील पुढील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री आमदार मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारे ट्विट केले. "माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन," असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.नार्वेकर यांच्या या ट्विटनंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. काही राजकीय निरीक्षकांनी या पोस्टबाबत प्रश्न उपस्थित केले असून तिच्या वेळेबाबत आणि राजकीय संदर्भांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय विश्लेषक दीपक पवार यांनीही या ट्विटवर प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत अशा प्रकारच्या शुभेच्छा संदेशामुळे विविध तर्क-वितर्कांना वाव मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.दुसरीकडे, पक्षातील संभाव्य घडामोडी लक्षात घेऊन ठाकरे गटाने संबंधित मतदारसंघांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला आहे. पक्ष संघटना आणि कार्यकर्ते आपल्या पाठीशी कायम राहावेत, यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात या राजकीय घडामोडी कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.