थकीत बिलांच्या विळख्यात आणखी एक बळी; पेमेंट न मिळाल्याने शासकीय कंत्राटदाराची आत्महत्या
मुंबई: शासनाकडून थकीत बिलांची रक्कम मिळत नसल्यामुळे राज्यातील कंत्राटदारांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय नवी मुंबईत आला असून, ६० लाखांच्या थकीत बिलाचे पैसे न मिळाल्याने गजानन देवकाते या ३७ वर्षीय शासकीय कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कंत्राटदार वर्गात तीव्र संताप उसळला आहे.

नेमकी घटना काय?
गजानन देवकाते यांनी २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत पाटबंधारे विभागाची सुमारे ६० लाखांची कामे पूर्ण केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना कामाचे पैसे मिळाले नाहीत. पैसे मिळवण्यासाठी त्यांनी मुख्य अभियंत्यांना पत्र लिहिण्यासोबतच शासकीय कार्यालयाच्या तब्बल १० फेऱ्या मारल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दाद मिळाली नाही. अखेर याच नैराश्यातून त्यांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) संध्याकाळी राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. त्यांना तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
८६ हजार कोटींची थकबाकी आणि राज ठाकरेंची भेट
राज्यातील शासकीय कंत्राटदारांचे तब्बल ८६ हजार कोटी रुपये सरकारकडे प्रलंबित आहेत. ही थकबाकी मिळावी यासाठी कंत्राटदार सातत्याने आंदोलने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेच्या आदराशीच (मंगळवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी गजानन देवकाते यांच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
कंत्राटदार संघटनांचा आक्रमक इशारा
या प्रकरणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देवकाते यांच्या आत्मसहत्येला जबाबदार असलेल्या संबंधित दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, राज्यभरात भव्य आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शासनाला देण्यात आला आहे.
कंत्राटदारांची प्रलंबित बिले तातडीने अदा करण्यासाठी शासनाने विभागनिहाय आढावा घेऊन निश्चित कालमर्यादेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी कायमस्वरूपी आर्थिक व्यवस्था निर्माण करावी, अशी आक्रमक मागणी आता जोर धरत आहे.




