‘शिवसेना पक्ष ५ हजार कोटींना विकला!’: निवडणूक आयोगावर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

‘शिवसेना पक्ष ५ हजार कोटींना विकला!’: निवडणूक आयोगावर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

मुंबई: निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दबावाखाली शिवसेना पक्ष आणि चिन्ह ५ हजार कोटी रुपयांना एकनाथ शिंदे गटाला विकले, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने एका ‘दलाला’ची भूमिका बजावली असून, आयोगाने केवळ शिवसेनाच नाही तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह एकूण चार पक्ष विकल्याचा दावाही राऊत यांनी मीडियाशी बोलताना केला.

सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या आमदार पात्रतेबाबतची सुनावणी सुरू असतानाच संजय राऊत यांनी या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

आमदार फोडण्यापासून निवडणूक आयोगातील सेटिंगपर्यंत ५ हजार कोटींचा खर्च’
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, "आम्ही शिवसेना घटनात्मकरित्या चालवली. पक्षाची अधिकृत घटना होती आणि पक्षामध्ये आमचे स्पष्ट बहुमत असतानाही निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेंना ५ हजार कोटींना विकला. मी हा आकडा ठामपणे सांगत आहे."

 हा हिशोब मांडताना राऊत पुढे म्हणाले, "आमदार फोडणे, त्यांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला नेणे, तसेच निवडणूक आयोगात 'सेटिंग आणि बेटिंग' करणे यात जनतेचे ५ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा पक्ष अमित शाह यांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला असून यात निवडणूक आयोग एजंट ठरला आहे."


भ्रष्टाचाराला पुरावे नसतात, पक्ष विकला हाच पुरावा!’
या गंभीर आरोपांविषयी पत्रकारांनी पुरावे विचारले असता राऊत म्हणाले, "भ्रष्टाचाराला कुठे पुरावे असतात का? एखादी लोकशाही आणि घटना जेव्हा उघडपणे विकली जाते, तेव्हा काय पुरावे हवेत? त्यांनी पक्ष विकला हाच सर्वात मोठा पुरावा आहे. एकनाथ शिंदेंना हा पक्ष गुणवत्तेवर (Merit) मिळालेला नाही, तर त्यांनी यासाठी मोठी किंमत मोजली आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात गेलो आहोत."


निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
निवडणूक आयोगाने दिलेल्या युक्तिवादांवर टीका करताना राऊत म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरेंकडे पक्षाची सूत्रे सोपवली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षाची नवी घटना तयार करून ती निवडणूक आयोगाला रीतसर कळवण्यात आली होती, ज्याच्या पोचपावत्या आजही आमच्याकडे आहेत. तरीही हा पक्ष अलोकशाहीवादी असल्याचा विचित्र युक्तिवाद आयोगाने आपल्या निर्णयात दिला आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.