‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणीही ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
बीड (प्रतिनिधी) : बीडच्या पिंपळनेर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या अनुष्का शिरसाट यांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात अनुष्का यांनी पती मिलिंद शिरसाट याच्याकडून होत असलेल्या छळाची धक्कादायक माहिती दिली. तसेच, ‘साहेब, त्याला जन्मठेप द्या’, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, फरार झालेल्या आरोपी पतीला पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर येथे कौटुंबिक वादातून ही घटना घडली. पती मिलिंद शिरसाट हा पत्नी अनुष्का यांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप आहे. या संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. 7 ऑगस्ट रोजी झालेल्या वादानंतर मिलिंदने अनुष्का यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे.
या घटनेवेळी त्यांचा मुलगा घटनास्थळी उपस्थित होता. आईला वाचवण्यासाठी मुलाने वडिलांकडे विनवणी केली. मात्र, मुलाची विनवणीही न ऐकता आरोपीने अनुष्का यांना पेटवून दिल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात सांगितले.
या घटनेत अनुष्का शिरसाट गंभीररीत्या भाजल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, 8 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अनुष्का यांचा जबाब नोंदवला होता. या जबाबात त्यांनी पतीकडून होत असलेल्या छळाची माहिती पोलिसांना दिली. ‘तो मला आणि मुलाला बेदम मारायचा. 7 ऑगस्टला पेट्रोल ओतताना मुलगा पप्पा मम्मीला मारू नका, म्हणून रडत विनवणी करत होता. तरीही त्याने मला पेटवून दिलं. साहेब, त्याला जन्मठेप द्या,’ अशी मागणी अनुष्का यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांकडे केली होती. त्यांच्या या जबाबामुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
अनुष्का या अंगणवाडी कार्यकर्त्या म्हणून काम करत होत्या. त्यांना मिळणारा पगारही पती स्वतःच्या बँक खात्यावर घेत असल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मात्र, या प्रकरणामागील नेमकी कारणे आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, पत्नीला पेटवल्यानंतर आरोपी मिलिंद शिरसाट घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याला बीडमधून ताब्यात घेत अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




