अशोक खरातच्या ऑफिसमध्ये एसआयटीला काय काय दिसलं?
मुंबई (प्रतिनिधी) : अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. अशोक खरात प्रकरणी पुन्हा एकदा तपासाला वेग आला आहे. एसआयटीचे पथक आज पुन्हा नाशिकमधील अशोक खरातच्या फोकस प्रॉपर्टी या कार्यालयात येऊन धडकलं. यावेळी पोलीस काही फिर्यादींना दाखल झाले होते. अशोक खरात याच्या काळ्या कारनामे चौकशी सुरू असून ओकस प्रॉपर्टी इथले कार्यालय उघडून आज पुन्हा तपासणी करण्यात आली. तसेच महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून अशोक खरातच्या कार्यालयाची मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आली.

अशोक खरात ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार करायचा त्या कार्यलयात आज एसआयटीचं पथक आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती. त्याच्या कार्यलयात ज्या भागात महिलांच्या कुटुंबीयांना बाहेर बसवुन तो अत्याचार करायचा. त्या केबिनमध्ये छोटे स्पॉट लाईट आहेत.(फोकस लाईट) मागच्या भिंतीवर "ओम"आहे. त्यामाध्यमातून अध्यात्मिक असल्याचे भासवून प्रभाव टाकला जात होता. तर बाहेरच्या बाजूला भारताचा राष्ट्ध्वज भिंतीवर लावला आहे. जिथे पिढीत महिलांचे कुटुंबीय बसायचे तिथे तिरंगा लावण्यात आला आहे.
एसआयटीच्या तपासात अशोक खरात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातने एसआयटीच्या तपासादरम्यान एक अजब दावा केला. माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले, असं अशोक खरात तपासात म्हणाला. तसेच महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग असल्याचा खळबळजनक दावा अशोक खरातने केला आहे. मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, असंही अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत सांगितले. यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार, असंही अशोक खरात चौकशीदरम्यान म्हणाला. अशोक खरातचा पोलीस कोठडीत देखील मंत्रजप सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.
स्त्रियांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातने अनेक उद्योजक, व्यावसायिकांनाही अक्षरशः भिकेला लावलं. पुण्यातले बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूदही असेच खरातचे शिकार झाले. खरातने जासूद यांना कोट्यवधींचा गंडा घातला. लॉजिस्टिकचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्ताने खरातच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी खरातने त्यांना अक्षरशः लुबाडलं. त्यांच्याकडून महागडी मर्सिडीझ गाडी उकळली. जासूद यांच्याच खर्चाने एक दोन नाही तब्बल 21 देशही खरात फिरला. गुरूसेवेचं आणि मृत्यूचं भय दाखवत अमेरिकेत उपचार करून घेतले. मिरगावातलं फार्महाऊसही व्यावसायिक जासूद यांच्या खर्चाने बांधलं. त्यातल्या फर्निचरसाठीही पैसे उकळले. आता याच जासूद यांनी एबीपी माझाशी संवाद साधलाय. अशोक खरात आणि माझी ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली होती असं त्यांनी म्हटलं.
अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे. गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला?, तपास यंत्रणांचा शोध सुरू आहे.




