ओमराजे शिवसेनेत येताच धाराशिवमध्ये राजकीय भूकंप; शिंदेंनी घेतले दोन मोठे निर्णय

ओमराजे शिवसेनेत येताच धाराशिवमध्ये राजकीय भूकंप; शिंदेंनी घेतले दोन मोठे निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, 'ऑपरेशन टायगर'नंतर राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनेक महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही तासांतच एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या विविध संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.याचबरोबर धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल 18 कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी स्थगित असलेल्या अनेक कामांना आता गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत या घडामोडींची माहिती दिली.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या महायुतीतील प्रवेशाचे स्वागत त्यांच्या राजकीय विरोधकांकडूनही करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्याची भूमिका मांडत ओमराजेंना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.दुसरीकडे, ऑपरेशन टायगरअंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा रंगली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.