मोशी कचरा डेपो दुर्घटनेत महिनाभरापूर्वी पतीचा मृत्यू; आता पत्नीनेही जीवन संपवलं
पुणे (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी रात्री उशिरा आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नागेश आणि सोनाली गायकवाड यांना दोन मुली आहेत. पतीच्या मृत्यूनंतर सोनाली तणावात आणि दुःखी असल्याचे सांगितले जात आहे. याच मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेत एकूण नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये नागेश गायकवाड यांचाही समावेश होता. आता त्यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांच्या निधनाने कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनाली या 23 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूपूर्वी कोणतीही सुसाईड नोट आढळली नसल्याची माहिती आहे. कमी वयात पतीला गमावल्याचे दुःख सहन न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा आहे. या घटनेनंतर त्यांच्या चिमुकल्या श्रेया आणि प्रिया यांच्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले आहे.
दरम्यान, मोशी इमारत दुर्घटनेला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या दुर्घटनेत नऊ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला, तर 12 कामगार जखमी झाले. मात्र, या दुर्घटनेशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर चौकशी, जबाब नोंदवणे आणि एसआयटीच्या तपासाची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मुख्य सूत्रधारांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे.
दुसरीकडे, महापालिकेने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.मृत कामगारांच्या नातेवाईकांना जाहीर करण्यात आलेली मदत आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्ण अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील पालिका प्रशासन, सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.




