माझी नार्को टेस्ट करा, हरकत नाही'; मनोज जरांगेंच्या आरोपांवर महसूल मंत्री बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई (प्रतिनिधी) : कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले असून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी जरांगेंनी केली होती. या आरोपांवर आता बावनकुळे यांनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, जात पडताळणी विभागाच्या कामकाजात सरकार किंवा कोणत्याही मंत्र्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.तसेच एखाद्याचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास संबंधितांना न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याचे त्यांनी सांगितले.
बावनकुळे म्हणाले, माझी नार्को टेस्ट करायला मला कोणतीही हरकत नाही. आम्हाला जात पडताळणी विभागाच्या कामात हस्तक्षेप करता येत नाही. मंत्री किंवा मी फोन करून त्या विभागावर दबाव आणतो, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. महसूल मंत्री म्हणूनही मला अशा प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. एखाद्या प्रकरणात जात पडताळणी विभागाने आक्षेप घेतला असेल, तर संबंधितांना उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
ते पुढे म्हणाले,जात पडताळणी विभाग ही स्वतंत्र अर्धन्यायिक यंत्रणा आहे. त्यांच्या निर्णय प्रक्रियेत सरकार किंवा कोणताही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही. कोणत्याही राज्यात मंत्री फोन करून जात पडताळणी विभागावर प्रभाव टाकतात, असे होत नाही. मनोज जरांगे यांना जर वाटत असेल की मराठा समाजातील काहींची प्रमाणपत्रे चुकीच्या पद्धतीने रद्द झाली आहेत, तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी. उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला होता की,बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले. त्यांनी मराठा समाजाचे नुकसान करण्याचे ठरवले आहे. त्यांची नार्को टेस्ट करा. एवढे अधिकार दिले तर तुमचे 15 ते 20 आमदार पाडीन. पैशांसाठी तुम्ही प्रमाणपत्रे रद्द केली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
तसेच, चंद्रशेखर बावनकुळेंच्या सांगण्यावरून मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत का? बावनकुळे इतके मोठे झाले आहेत का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एवढे अधिकार दिले आहेत का? अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली होती.




