शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरे यांचे मराठी जनतेला विशेष आवाहन
मुंबई (प्रतिनिधी) : देशासह जगात आज 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. या सोहळ्यानिमित्य किल्ले रायगडावर देशभरातून हजारो शिवभक्तांची मांदियाळी राजगडावर जमली आहे. तर राज्यातील इतर भागात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या पवित्र सोहळ्याच्या निमित्यने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खास पोस्ट करत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. सोबतच राज ठाकरेंनी मराठीजनांना खास आवाहन देखील केलं आहे.

आज शिवराज्याभिषेक दिन. या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. ६ जून १६७४ ला जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल त्यावेळचं वातावरण काय आनंदी, उत्साही असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण हिंद प्रांत हा परकीयांच्या आक्रमणाने पूर्ण खचला होता. आक्रमकांच्या फौजांपुढे आपला टिकाव लागणारच नाही हे गृहीत धरून जवळपास प्रत्येक जण आक्रमकांना शरण गेला होता. अशावेळेला 'स्वराज्य' असावं असं स्वप्न बघायचं, आणि वयाच्या 15 व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची आणि पुढे 1 वर्षांत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करायची.
पुढे जवळपास 29 वर्ष झुंज देऊन एक असं राज्य जिथे आपली संस्कृती, आपली भाषा, यांना कुठलाही अटकाव नाही, आपली करपद्धती, आपली राज्यशासन पद्धती असलेलं एक राज्य उभं करायचं आणि त्याची घोषणा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगासमोर करायची. हा दिवस असा दिवस आहे ज्याने पुढे मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवलीच पण पुढे ब्रिटिशांच्या विरोधात उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देखील राज्याभिषेक दिनातूनच मिळाली.




