‘देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागू नका’; दिविजा फडणवीसचा जन्माष्टमीचा खास व्हिडीओ चर्चेत

‘देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागू नका’; दिविजा फडणवीसचा जन्माष्टमीचा खास व्हिडीओ चर्चेत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमधून तिने देवाची भक्ती कशी करावी आणि देवाला भक्तांकडून नेमकं काय अपेक्षित असतं, याबाबत सुंदर संदेश दिला आहे.

दिविजा व्हिडीओमध्ये म्हणते की, आपण नेहमी देवाकडे काही ना काही मागत असतो. ‘देवा माझं हे काम कर, देवा माझं ते काम कर,’ असं आपण म्हणतो. मात्र, देव आपल्याकडून काय मागतो, याचा विचार आपण कधी केला आहे का, असा सवाल ती करते. भगवद्गीतेचा संदर्भ देत दिविजा सांगते की, जो भक्त प्रेम, भक्ती आणि स्नेहाने देवाला फळ, फूल, पाणी किंवा अगदी एक पानही अर्पण करतो, तो श्रीकृष्णाला प्रिय असतो. देवाला महागड्या वस्तूंपेक्षा भक्ताचं प्रेम आणि श्रद्धा अधिक प्रिय असल्याचा संदेश तिने दिला आहे.

 दिविजा पुढे म्हणते, ‘देवाचे प्रिय होण्यासाठी भरपूर फुले किंवा फळं अर्पण करण्याची गरज नाही. देवासाठी तुमच्या प्रेमापेक्षा आणि भक्तीपेक्षा मोठं काहीही नाही.’ तसंच, या जन्माष्टमीला देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याऐवजी त्यांना प्रेम, स्नेह आणि भक्ती अर्पण करा, त्यांचं चिंतन करा आणि साधनेसाठी थोडा वेळ द्या, असं आवाहनही तिने केलं आहे.

 ‘हरे कृष्णा, हॅप्पी जन्माष्टमी!’ म्हणत दिविजाने हा व्हिडीओ शेअर केला असून तिचा हा भक्तीमय संदेश सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.