एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच मंचावरील समईने घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी वेळीच आग विझवली

एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच मंचावरील समईने घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी वेळीच आग विझवली

मुंबई (प्रतिनिधी) :  ठाण्यात परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या कार्यक्रमादरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. दीपप्रज्वलनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असतानाच व्यासपीठावरील समईने अचानक मोठा पेट घेतला.समईचा भडका उडताच मंचावर उपस्थित असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवलं. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी जवळच असलेली फुलं समईवर टाकून आग विझवली.

 ठाण्यात परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना काही वेळातच बाजूला ठेवलेल्या समईने अचानक भडका घेतला आणि ज्वाला वाढू लागल्या.

आग लागल्याचं लक्षात येताच प्रताप सरनाईक यांनी तातडीने जवळ असलेल्या हारातील फुलांचा वापर करत समई विझवली. त्यांच्या या तत्परतेमुळे मंचावर मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला असून, या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.