सचिन अहिर शिंदे गटात; उपसभापतीपदाचा अर्ज भरताच उद्धव ठाकरेंना पाठवलं भावनिक पत्र
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन अहिर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत दिसू लागले आहेत. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. कालपर्यंत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत सक्रियपणे काम करणारे सचिन अहिर आज शिंदे शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं की, सचिन अहिर यांनी पक्षांतर केलेलं नसून त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यानंतर सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. आपल्या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, काही अपरिहार्य कारणांमुळे भारतीय कामगार सेना तसेच पक्षातील पदांचा राजीनामा देत असल्याचं नमूद केलं आहे. तसेच पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी काळात या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात आणखी कोणते बदल होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




