भारत - पाकिस्तान युद्धासंबंधी अतुलशास्त्री भगरे यांचं मोठं भाकित... म्हणाले 36 तासांत....

पंढरपूर :जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे यांनी युद्धासंबंधी मोठा अंदाज वर्तवला आहे.
जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे पाठबळ असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच भारताने युद्धाचा सराव सुरु केल्याचंही चित्र आहे. त्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. परंतु भारत-पाक यांच्यात प्रत्यक्ष युद्ध झाल्यास काय परिस्थिती निर्माण होईल, ग्रहमान कोणत्या देशासाठी अनुकूल आहे, याविषयी ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे यांनी भाकित वर्तवले आहे. 36 तासात युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे, परंतु पाकिस्तानची अवस्था बिकट असून भारताला ग्रहमान अनुकूल असल्याचा अंदाज भगरे गुरुजी यांनी वर्तवला आहे.
ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे यांचं भाकित काय?
"जगासमोर सध्या मोठं आव्हान उभं आहे. ज्या ठिकाणाहून आतंकवादी जगभर पसरले, त्याचं आश्रयस्थान असलेला देश म्हणजे पाकिस्तान. त्यांनी काश्मीरमध्ये कुरापत केली आणि आपला देश खडबडून जागा झाला. आता पाकिस्तानवर निर्बंध लादले जाणार, यात शंका नाही. पण सर्वसामान्यांच्या मनातील भावना आहे, की यांची एकदाची खोड मोडली पाहिजे" असं अतुलशास्त्री भगरे म्हणाले. ते पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
भगरे यांच्या मते, "सिंधू आणि चेनाब नदीच्या पाण्यावरून सुरु असलेली पाकिस्तानची कोंडी महत्त्वाची ठरेल, पण सामान्य जनतेत संताप असल्याने केंद्राला कठोर भूमिका घ्यावी लागेल." त्यांनी तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेकडेही सूचक इशारा दिला.