मलेशियात ‘क्रॉस बॉर्डर ग्लोबल इंजिनिअरिंग प्रोग्राम’ डी.वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १५ विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापुरातील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि मलेशियाच्या युनिव्हर्सिटी केबांगसान मलेशिया (यूकेएम) यांच्यात ऐतिहासिक शैक्षणिक करार झाला आहे. याअंतर्गत महाविद्यालयातील १५ विद्यार्थी आणि एक प्राध्यापक येत्या ८ ते १५ सप्टेंबर दरम्यान मलेशियात होणाऱ्या ‘क्रॉस बॉर्डर ग्लोबल इंजिनिअरिंग प्रोग्राम’मध्ये सहभागी होणार आहेत.
यूकेएमचे अधिष्ठाता प्रा. डॉ. मोहम्मद स्युहामी अब रहमान (फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड बिल्ट एन्व्हायरमेंट) आणि डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या स्वाक्षऱ्यांनी हा करार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्थात्मक सहकार्य आणि जागतिक पातळीवरील अनुभव उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या सहकार्यातून संयुक्त संशोधन, विद्यार्थी-प्राध्यापक देवाणघेवाण आणि जागतिक आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास गती मिळणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना चीन, जपान, तैवान आणि मलेशिया येथील समवयस्कांसह काम करण्याची संधी मिळणार आहे. इंडस्ट्री 4.0, आयओटी ऑटोमेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. यूकेएमच्या ‘पेमरकासान कॉम्पेटेन्सी अकॅडेमिक सिस्वा’ या संशोधन गटासोबत हेल्थकेअर, शिक्षण, उद्योग सुरक्षा आणि उत्पादकता वाढीसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करण्यावर भर दिला जात आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य प्रा. एस. डी. चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे सहकार्य लाभले. आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे डॉ. सनी मोहिते आणि डॉ. कीर्ती महाजन यांनी समन्वय साधला.