उद्या बानगेत पायी वारीतील विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींचा पूजन सोहळा

उद्या बानगेत पायी वारीतील विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींचा पूजन सोहळा

बानगे - बानगे ता. कागल येथे उद्या रविवारी ३ ऑगस्ट रोजी  गावागावांतून पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीतील विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींचा पाद्यपूजन सोहळा संपन्न होणार आहे. बानगे येथील विद्यामंदिर शाळेच्या मैदानावर सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ह. भ. प. सचिनदादा पवार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आळंदी देवाची संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. डाॅ. भावार्थ रामचंद्र देखणे महाराज उपस्थित राहणार आहेत. पूजन सोहळा व भोजन प्रसाद झाल्यानंतर दुपारी दोन ते चार या वेळेत मुंबईतील प्रख्यात युवा कीर्तनकार ह. भ. प. जयेश भाग्यवंत महाराज यांची सुश्राव्य कीर्तनसेवा होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

          

याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी साडेनऊ वाजता हा सोहळा सुरू होणार आहे. या सोहळ्यात मंत्री मुश्रीफ व त्यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांच्या हस्ते कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील गावांमधून पायी वारीला जाणाऱ्या दिंड्यांमधील ८५ विणेकरी व ८५ तुळशीवाल्या माऊलींच्या पायांचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन होणार आहे. 

मस्तक हे पायावरी....! 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा फार मोठी आहे. "मस्तक हे पायावरी | या वारकरी संतांच्या || या उदात्त भावनेतून या सोहळ्याचे आयोजन केले आहे. जनतेने मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.